प्रत्येक ‘ती’चं असंच होतं. लग्नाची तारीख जवळ येते तसं हळूहळू टेन्शन वाटायला लागतं. तिला स्वत:लाही लगेच समजणार नाही असं टेन्शन.
आई-बाबांकडून होणारे लाड, नातेवाईकांकडून होणाऱ्या चौकशा, होणाऱ्या नवऱ्याकडून होणारे लाड, काळजी या सगळ्यात ते ‘टेन्शन’ असं समोर पुढय़ात ठाण मांडून बसलेलं दिसत नाही एवढंच. पण जेव्हा काही क्षण एकटय़ाचे मिळतात तेव्हा मात्र खूप सारे प्रश्न भिरभिरायला लागतात डोक्यात. सवयीचं आयुष्य मागे सोडून जायचंय.. कुठेतरी दुसऱ्या घरी. त्या घरीपण आई-बाबा आहेत, पण ते आपले नाहीत. त्यांची आणि आपली ओळख अवघ्या काही वर्षांपूर्वीची. ते आधी काका-काकू होते. आता त्यांना लक्षात ठेवून आई-बाबा म्हणावं लागणार. फक्त म्हणावं लागणार नाही तर त्यांना आपल्या आई-बाबांइतकंच जवळचं मानावं लागणार.
मानता येईल का, असं कोणाला आई-बाबा? हक्काने आईकडे बोलता, भांडता येतं तसं त्यांच्याकडे करता येईल का? आपलं जगणं सोडून त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत मिसळून जाता येईल का? स्वत:कडून अपेक्षा तर आहे असं करायची पण असं शक्य होतं का? एखादं वाढलेलं रोपटं दुसऱ्या मातीत त्याच जोमाने रुजू शकतं का? नाही रुजता आलं तर? नव्या घरी आनंद नाही वाटता आला तर? आई-बाबांच्या संस्कारांवर, त्यांच्या शिकवणुकीवर शंका घेतली गेली तर.. आणि आपल्या आई-बाबांचं काय? त्यांच्याही सगळ्या अपेक्षा त्यांच्या होणाऱ्या जावयाकडून पूर्ण होतील ना नक्की? नाही झाल्या तर..
प्रश्नांची ही यादी वाढतच राहते.
यातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ‘ती’ तात्पुरती देते. म्हणते, होईल सगळं नीट. आरामात सारं काही निभावून नेता येईल. आजूबाजूच्या कित्तीजणी निभावून नेतात. फार काही कठीण नसतं.. पण आजूबाजूंच्यांच्या काही जणींच्या बाबतीत ठीक असेल. पण अशा नसणाऱ्याही काही जणी असतातच की! काहींना आई-बाबांनी सासर या गोष्टीची जाणीव करून दिलेली असते, त्यांना तसं घडवलेलं असतं. तू दुसऱ्या घरी जाणार हे वाक्य सतत सांगितलेलं असतं. त्या हळूहळू स्वत:ला मानसिकदृष्टय़ा तयारही करतात. पण काहींना आई-बाबांनी लहानपणापासून कधीच जाणीव करून दिलेली नसते की तुला कधी दुसऱ्या घरी-बिरी जायचंय. सासरी गेल्यावर असं करायला लागेल नि तसं करायला लागेल. स्वयंपाक करायला आलाच पाहिजे. पानात कसं वाढायचं तेही शिकलं पाहिजे. डाव्या बाजूला काय, उजव्या बाजूला काय.. छान रांगोळ्या घालता आल्या पाहिजेत. शिवण-टिपण सगळं जमलं पाहिजे. यातलं त्यांनी काहीच सांगितलेलं नसतं, शिकण्याची जबरदस्ती केलेली नसते. अशा वेळी आत्तापर्यंतच्या आयुष्यात या गोष्टी न शिकल्याने फरक नाही पडला, पण आता पडणार ही जाणीव मग बेचैन करायला लागते. पावलोपावली आपल्याला काय येतं नि काय नाही हे तपासलं जाणार का, असं वाटायला लागतं.
या सगळ्याची गरज फक्त संस्कार तपासायला भासते की जगताना खरोखरच या सगळ्याची नितांत गरज असते? पोट भरण्यापुरती पोळी-भाजी, वरण-भात करता आला की काम संपलं असं लग्नानंतर होत नाही का? लग्नापर्यंत स्वयंपाकघरात काम करण्याच्या वेळा फार कमीच येतात आताच्या मुलींच्या आयुष्यात. आधी अभ्यास मग नोकरी. लग्नापर्यंतचं आयुष्य यातच बुडालेलं असतं. अर्थात वीकेण्ड्सना मित्रमैत्रिणींसोबत उनाडक्याही असतात. लग्नापर्यंतचं हे सगळं मजामस्तीत बुडालेलं आयुष्य तिला कधीतरी घाबरवायला लागतं अपेक्षा या शब्दाच्या आधारे.. मग तिला वाटतं, त्यालापण घाबरवतो का अपेक्षा हा शब्द.. की मुलींनाच भीती वाटते या बदलाची?.. पण बदल फक्त तिच्याच आयुष्यात होणार आहेत का? त्याच्या आयुष्यात नाही का होणार? तिचं आयुष्य जसं बांधलं जाणार तसं त्याचंही बांधलं जाणारच ना? मग त्याला का नाही एवढं टेन्शन?
उत्तर थोडंसं सोपं आहे. माहीत असलेलंच. लग्न म्हणजे त्याच्या आयुष्यात फक्त अॅडिशन होणार आहे. त्याच्या आयुष्यातून दूर जाणाऱ्या गोष्टी फार नाहीत. त्याचं घर तेच असणार जिथे तो वाढला, त्याचे आई-बाबा त्याच्यासोबतच असणार. मित्रमैत्रिणी जवळपासच असणार. तिच्या बाबतीत एवढं सुरळीत होत नाही. ती लग्नासाठी मानसिकदृष्टय़ा तयार असली आणि नसली तरीही. लग्न झाल्यावर वेळ काढून तिला आईला भेटायला जावं लागणार, बाबांबरोबर गप्पा मारायला वेळ शोधावा लागणार. मित्रमैत्रिणींना आधी कळवावं लागणार की मी या दिवशी आईकडे येतेय, मला भेटा.. आणि हे तर फक्त लग्नाच्या आधी जाणवणारे लहानसे बदल!
लग्न करून जाताना कित्ती गोष्टी मागे राहणार आहेत तिच्या. पुस्तकांचं कपाट, शो-पिसेस, सॉफ्ट टॉइज, शोधून शोधून जमवलेली ग्रीटिंग्ज, सीडीज, कॅसेट्स, कदाचित बरेचसे कपडे, अॅक्सेसरीज. यातल्या फार कमी गोष्टीला त्याच्या घरात जागा मिळणार असते. त्याच्या घरात त्याचा पसारा असतोच की आधीपासून. मग तिच्या पसाऱ्याला कशी जागा मिळेल? काय न्यायचं, काय नाही याचीही लिस्ट करायला लागते तिला. अगदी रोजची सवयीची गाणीही पेन ड्राइव्हवर ट्रान्सफर करायला लागतात. ते घर आणि हे घर असं कॅटेगरायझेशन आपोआपच होतं. तिथे काय-काय लागेल, काय काय करता येईल, काय-काय नाही करता येणार याबद्दल डोक्यात विचार सुरू होतात. हवं तेव्हा कॉम्प्युटरवर मोठय़ाने गाणी लावून बसलं, असं कदाचित तिथे नाही करता येणार.. त्याच्या आई-बाबांना तशी सवय नसेल कदाचित. सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत अशी गाणी लावलेली त्याला आवडत नसतीलही कदाचित. तिने त्याला कधी अशा गोष्टी विचारलेल्याच नसतात. खरं तर त्या विचारायचं डोक्यातच आलेलं नसतं. जगणं बदलणार हे जाणवूनही त्यासाठी खूप तयारी करावी लागेल असं वाटलेलं नसतं. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं की मग एकत्र राहणार आता काही दिवसांनी, एकच रूम शेअर करणार, एकच वॉर्डरोब शेअर करणार असा सगळा विचार मनात येतो आणि हा विचार करायला लागल्यावर सगळ्या लहान-लहान गोष्टींबद्दल जाणीव होते. रोजचं जगणं कसं असेल हे नीटसं ठाऊकही नसतं. एकत्र राहायला लागल्यावरच ते कळतं. खरं सासरी जाणाऱ्या मुलीने त्यासाठी मानसिकदृष्टय़ा तयार होणं गरजेचं असतं. त्याचा विचार तिने करायलाच हवा असतो. कोणत्याही गोष्टीचा धक्का बसू नये म्हणून. अगदी सकाळी चुळा भरण्याच्या आवाजापासून, एकच पांघरूण शेअर करण्यापर्यंत सगळं डायजेस्ट करता यावं म्हणून.. पण हा विचार करूनही, मानसिकदृष्टय़ा तयार होण्याचा प्रयत्न होऊनही तिला वाटतं की असं सगळं डायजेस्ट नाही झालं तर? कधी कधी ज्या गोष्टींवरून, ज्या न आवडणाऱ्या गोष्टींवरून भांडणं होतात, त्या गोष्टी, त्या सवयी एकत्र राहायला लागल्यावर किती त्रासदायक ठरतील. त्यावरून किती भांडणं होतील? की हळूहळू या सगळ्याची सवय होईल? दूर नाही जावंसं वाटणार कधी या सगळ्यापासून? लग्न का केलं या व्यक्तीशी असं नाही का वाटणार?
या प्रश्नाचं उत्तर लग्न थोडंसं मुरलेल्या, नवीनच झालेल्या, होऊ घातलेल्या सगळ्यांना विचारलं. खरं तर सगळ्यांनाच अशी भीती वाटते. पण ती भीती व्यक्त करण्याचीही भीती जी असते ती खूप गोष्टी दडपून ठेवते मनातच. याचं उत्तर देताना सगळ्यांनी सांगितलं की, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा प्रत्येक माणूस स्वत:ला प्रश्न विचारतो की आपण या व्यक्तीशी लग्न का केलं? काय विचार केला होता लग्नाचा निर्णय घेताना? कशावर भाळलो? आणि खरं तर असा विचार करण्यात चुकीचं काही नाही. कधीतरी या व्यक्तीपासून दूर राहावं काही दिवस असंही वाटू शकतं. पण तरी ही फेज असते आणि ती संपते तेव्हा लक्षात येतं की हीच व्यक्ती आपल्यासोबत आयुष्य शेअर करायला योग्य आहे. मुळात स्वत:चं अस्तित्व टिकवण्याची प्रत्येकाचीच अशी धडपड असते. अॅडजस्टमेण्ट केली तरी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. त्यामुळे हे प्रश्न पडणं जर नैसर्गिकपणे घेतलं तर त्याचा त्रास कमी होतो. त्याबद्दल गिल्टी वाटून घेत राहिलं तर ती जाणीव खूप कुरतडत राहते. अर्थात अशी जाणीव खूप वेळा येत राहिली तर त्याबद्दल नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण अशा जाणिवेचा विचार आता का करायचा.. आपण या व्यक्तीशी लग्न का केलं याचं उत्तर जेव्हा हीच व्यक्ती आपल्याला झेलू शकते, असं मिळतं ना तेव्हा मग बाकीचे विचार गौण असतात. लग्नाचं लोणचं छान मुरलेले सांगतात की लग्न झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पहिलं वर्ष. ते वर्ष आपण एकमेकांना खऱ्या अर्थाने ओळखण्यात, सहन करण्यात, एकमेकांसाठी अॅडजस्ट करण्यात घालवतो. ते वर्ष पार पडलं की मग पुढचा प्रवास सुकर व्हायला हरकत नसते.
या पहिल्या वर्षांत सगळ्याच परीक्षा असतात. पाठराखीण घरी परतल्यानंतर खरं तर सगळ्याला एकटय़ानेच सामोरं जायचं असतं. नवरा पण परका वाटतो कधी-कधी. काय ओळखलं आपण ह्या माणसाला असंही वाटू शकतं. अशातच लग्न या समारोहाचा आणखी एक महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे हनिमून. हनिमूनला दोघं जातात एकमेकांना जाणून घेण्याच्या उत्सुकतेतून. मग न पटणाऱ्या गोष्टींची ओळख तिथे अधिक सखोल व्हायला सुरुवात होते. मला अजून झोपायचं होतं, मला एवढय़ा लवकर उठायची सवय नाही, तू मला एकटा सोडून का निघून गेलास, मीच का तुझ्या आधी उठून आवरायचं, तू का नाही कधी हॉटेलमध्ये ऑर्डर देत आणि असं तसं बरंच काही.. पण तिथे तुटेल इतकं ताणायचं नाही. इगो बाजूला ठेवायचा. मुरलेल्या लोणच्यांचे हे सल्ले खरं तर खूप उपयोगी पडतात. शक्यतो भांडणं झाल्या दिवशी संपवायची, फार काळ ताणायची नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं पाहिजे. दाटलेलं मळभ दूर झालं की जास्त छान वाटतं अगदी तसंच.. कारण लग्न, हनिमूनचे हे चमकदार दिवस पटकन संपतात. आणि हे दिवस संपले की सुरू होतं रुटिन आणि या रुटिनमध्येच घर, ऑफिस, जबाबदाऱ्या यांचे रंग दिसायला लागतात. सवयीच्या झालेल्या बस, ट्रेन, रिक्षा हे सगळंच बदलतं तिच्या आयुष्यात. घरातच नाहीत तर ऑफिसपर्यंत जातानाही नव्या गोष्टी शिकायला लागतात. अगदी शेअर रिक्षा कुठे मिळते, स्टेशनला जाणारी बस कुठे मिळते, बस नंबर, ट्रेनने जायचं झालं तर गर्दीच्या वेळी कसं चढायचं, कुठच्या बाजूने चढायचं, कुठच्या बाजूला कुठचं स्टेशन येतं, कोणत्या बाजूला उभं राहायचं, गाडी घेऊन जायची झाली तर जवळ पेट्रोलपंप कुठे आहे, गरज पडल्यावर त्या रस्त्यावर मेकॅनिक कुठे मिळेल, गाडी कोण धुऊन देणार, अशा कितीतरी गोष्टींचा विचार करायला लागतो. अर्थात ऑफिसला जायच्या आधी ऑफिसला न्यायचा डबा हा मुद्दाही असतोच. त्याची तयारी. स्वयंपाक करायला बाई असेल तरी तिला सूचना द्याव्याच लागतात. वर्षांनुर्वष कामं करून कंटाळलेल्या सासूबाई घरच्या जबाबदारीतून रिटायरमेण्टच्या तयारीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करता येणं कठीण. अर्थात सगळ्याच सासू ऊर्फ अहो आई अशा असतात असं नाही. सकाळी मुलाच्या डब्यासोबत सुनेचाही डबा भरून देते. पण मग त्या सुनेलाच कानकोंडं होतं. सासूबाईंना आपण मदत करू शकत नाही, याचं वाईट वाटतं. खरं माहेरी असताना आई असाच डबा भरून तयार ठेवायची तेव्हा असं गिल्टी फीलिंग कधी मनाला जाणवलंही नव्हतं. तेव्हा हक्क होता. मग आता.. लग्न झाल्यावर बदलतं जग असं जे म्हणतात, तेच हे! लग्नाच्या आधी स्वत:ची तयारी करणारा नवरा मग कधी हेल्मेट कुठे ठेवलं, जरा रुमाल दे, डबा बॅगेत ठेवून दे वगैरेही सांगायला लागतो. कधी त्याला वाटतं तिला या गोष्टी करायला आवडतील म्हणून आणि कधी तिला वाटतं त्याला असे लाड करून घ्यायला आवडतात म्हणून.. आणि मग ती स्वत:चं आवरत-आवरत सकाळची ही गडबड चांगल्या पद्धतीने पार पाडायचा प्रयत्न करते. सांभाळून घ्यायचं, भांडायचं नाही वगैरे संस्कार तिच्या डोक्यात घोळत असतात.
हे रुटिन अॅडजस्ट करताना मग लग्नाच्या आधी सोबत बागडणाऱ्या मित्रमैत्रिणींचे टोमणे असतातच. आता काय वेळ नाही.. आता काय घरच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणे.. बिझी माणसं.. वगैरे वगैरे वगैरे. असे टोमणे ऐकले की कळतंच नाही काय उत्तरं द्यायची! रुटिन अॅडजस्ट करताना नाकी नऊ आलेल्या तिला मग स्वत:साठी वेळ हवासा होतो. वीकेण्डला तो जातो त्याच्या मित्रांसोबत. तो स्वत:चं पूर्वीचं आयुष्य जगायचा आटोकाट प्रयत्न करतोय. मलाच का नाही जगता येत ते पूर्णपणे मोकळं आयुष्य परत म्हणून तिला येणारं फ्रस्ट्रेशन.. पुढच्या आठवडय़ाची तयारी, शॉपिंग, इस्त्रीला द्यायचे कपडे अशातच अनेकदा तिचा वीकेण्ड संपतो. लग्नापूर्वी किती वेळ मिळायचा त्याच्यासोबत. लग्न झाल्यावर आणखी वेळ मिळेल असं वाटलं होतं पण आता वीकेण्ड्सना दोघांनी एन्जॉय करणं किती कमी झालंय असं तिच्या मनात डोकावलेलं वाक्य.. लाडात वाढलेल्या तिने केलेली अॅडजस्टमेण्ट लाडात वाढलेल्या त्याच्यापर्यंत अनेकदा पोहोचत नाही. घरातल्या कामांना हात न लावणारी ती जेव्हा त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करते तेव्हा त्याचा संतापही होतो. अशा परिस्थितीत दोघंच राहत असतील आणि दोघेही नोकरी करत असतील तर या संवांदांना आणखीनच पैलू प्राप्त होतात. काम करणाऱ्या बाईवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसण्यापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात. आज रात्री बाहेरच जेवूया, हॉटेलमधून जेवायला मागवूया, मला बाहेरचं जेवून वैताग आलाय, बाई आली नाही, दोन दिवसांची भांडी तशीच सिंकमध्ये पडली आहेत, शिस्तच नाही तुला हातासरशी कपामध्ये पाणी घालून ठेवायची वगैरे वगैरे वाक्यांच्या फोडण्या रोजच्या जगण्याला मिळत जातात. या सगळ्यात तिने ऑफिसमधून येऊन चढवलेला कुकर, दमूनही ताजी केलेली पोळी-भाजी आणि त्यानंतरची तिची कौतुकाची अपेक्षा आणि त्याने कौतुक न करताच जेवून झाल्यावर ऑन केलेला टीव्ही.. तुला कौतुकच नाही मी केलेल्या स्वयंपाकाचं. यावरचं त्याचं वाक्य, अगं त्यात काय कौतुक, रोजचं काम आहे ते किंवा तू छान जेवण बनवावंस म्हणून तुझ्याशी लग्न केलं नव्हतं. त्यासाठी स्वयंपाकीणपण असते की. या स्वयंपाकात वेळ कोण घालवायला सांगतं तुला.. या उत्तरं-प्रत्युत्तरांवरून बिनसत गेलेला दोघांचा मूड. लग्नाच्या आधी यातलं काहीसुद्धा नसतं. तिने हौसेने केलेला पदार्थ आणि त्याने त्या हौसेने केलेल्या पदार्थाचं कौतुक किंवा त्याने स्वत:चं स्वयंपाकघरातलं कौशल्य दाखवायचा केलेला प्रयत्न आणि मग लग्नानंतरही तो असाच मदत करेल अशी तिच्या मनात निर्माण झालेली आशा.. पण रुटिन सुरू झालं की अनेकदा या अव्यक्त आशा-अपेक्षांना तिलांजली द्यावी लागते. अशा वेळी स्पष्ट व्यक्त होणं अधिक मदतीचं ठरतं, असा अनेक लग्न झालेल्या आणि अशी खठ्ठी-मिठी भांडणं अनुभवणाऱ्यांचा सल्ला असतो.
लग्नानंतर अनेकदा तिला जास्त अॅडजस्ट करायला लागतं याबद्दल सारासार विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाचं दुमत असू शकणार नाही. अशा अॅडजस्टमेण्टमध्ये दोघांना एकमेकांची मिळालेली सोबत, पाठिंबा, एकमेकांवरचा विश्वासच नात्यासाठी आणि दोघांच्या एकत्र आयुष्यासाठी साह्यभूत ठरतो आणि मग पन्नास वर्षांनंतरही लग्नाच्या वाढदिवशी काढलेल्या फोटोतलं खरं हसू आणि चेहऱ्यावरचा आनंद ‘हॅपी मॅरिड लाइफ’चं नेमकं सिक्रेट शोधण्यासाठी इतरांना भाग पाडतं. आणि इतरांनी असा शोध सुरू केला की मग, एका मातीतून उपटून काढून दुसऱ्या मातीत रुजवलेलं आणि त्यानंतर जोमाने बहरलेलं हे त्यांच्या आनंदाचं झाड जन्मोजन्मी हवं असल्याची तिची आणखीनच खात्री पटते. हे नातं शतजन्मीचं असल्याचं समाधान वाटतं. तिलाही आणि त्यालाही.. प्रत्येक ती अशाच तर दोघांच्या समाधानाच्या शोधात असते. |
|