प्रीती दारव्हेकर?..
हजर!
अश्विनी कुलकर्णी? .
हजर!
मंजिरी पोतदार?
हजर!
सुजाता मुळ्ये?.
हजर!
सोनाली चांदेकर?
हजर!
सोनाली कुलकर्णी?
हजर!
‘बाई हजेरी झाली. फक्त दिपाली पटवर्धन आणि क्षमा जोशी गैरहजर आहेत’
‘का गं?. कालही आली नव्हती ना क्षमा जोशी?
‘बाई तिला ना.........’ असा संवाद पुढे सुरु ठेवावा असं वाटत होतं. पण उपस्थित असलेल्या बाकी मुली माझ्या घरी आल्या होत्या आणि हजेरी सांगायला बाईंच्या जागी माझे आई-बाबा होते.
घाट घातला होता सुजाताने. गेले वर्षभर आमच्या दोघींचे फोन, एसएमएस चालू होते- एकदा जमू या गं-साठी. एकदोनदा अगदी ठरतही आलं होतं. पण काही कारणानं ऐनवेळी बारगळलं. आम्ही सगळ्या पहिली ते दहावी पर्यंतच्या मैत्रिणी. काहीतर शिशूगटापासूनच्या. शाळा संपल्यावर कॉलेज, अभ्यास, करिअर, लग्न, मुलं या प्रवाहात शाळेतल्या मैत्रिणींचं भेटणं ठरवताच आलं नाही. शाळेनी तर कधीच उत्साह दाखवला नाही. दरवर्षी पुढच्या इयत्तेत जाणाऱ्या, दहावीनंतर शाळा सोडून जाणाऱ्या पिढय़ांच्या वेगात शाळेच्या इमारतीला कुठून उसंत मिळणार? आम्ही कधीतरी कुठेतरी भेटायचो. पण ओझरत्याच. एखादीच्या लग्नात, कुठल्या कार्यक्रमाच्या शेवटी, कधी अचानक एअरपोर्टवर, हॉटेलमध्ये. मग नेहमीप्रमाणे ‘एकदा भेटूया ना गं सगळ्याजणी’चं ध्रुवपद व्हायचं. पण तेवढंच. यावेळी मात्र सुजाताने मनावरच घेतलं. शांत, हुषार, नुतनसारखी कोमल दिसणारी सुजाता. तिच्यात नेतृत्व आणि समन्वयकाचे गुण असतील असं वाटलंच नव्हतं.
पुण्यातल्या माझ्या घरी भेटायचं ठरलं. गंमत म्हणजे कुणालाच पत्ता सांगावा लागला नाही. शाळेचा रस्ता विसरतो का आपण कधी? तसंच शाळेतल्या मैत्रिणींच्या घराचा पत्ता आणि रस्ता. मलाही सगळं घडाघडा आठवायला लागलं. प्रत्येकीची घरं. घरची माणसं, भावंडं, बागेतली झाडं, स्वयंपाकघर, जिने... प्रीतीचा छोटा भाऊ माधव. सुजाताची लग्न झालेली मोठी बहीण. आशूनी शाळा बदलल्यावर झालेलं वेडय़ासारखं अनावर दु:ख, मंजूकडे टेपरेकॉर्डर लावून केलेले नाच, तिच्या आईची लुना, तिच्या घरी खाल्लेला पहिला मासा. सोनाली चांदेकरची सायकल आणि आमच्याच वर्गातली तिची आतेबहीण माधवी क्षीरसागर. काल शूट झालेल्या सीनमधली वाक्य पण आज आठवत नाहीत कधी कधी. पण अजूनही मला वर्गातल्या प्रत्येकीची नावं वडिलांच्या नावासकट लक्षात आहेत.
स्मृतींच्या पेटीतला एक खोल कप्पा उघडला होता. कित्ती काय काय बोललो आम्ही! एकमेकींची चौकशी, न आलेल्या मैत्रिणींची खबरबात. शाळेतल्या बाई, सर. चौथीनंतर दुपार विभागात गेलेली आमच्या वर्गातली मुलं. सगळ्यांबद्दल बोललो. प्रत्येकीची गोष्ट वेगवेगळ्या वळणावर होती. लग्न नवरा, घरचे, नोकरी, मुलंबाळं. एकदम भरुनच यायला लागलं मला. दुसरी ‘अ’ किंवा सातवी ‘अ’च्या वर्गात दोन पोनी टेल्स किंवा वेण्या घातलेल्या आम्ही मधल्या सुट्टीत गप्पा मारतोय असं वाटायला लागलं. विषामृत किंवा लंगडी खेळून डबा खायला बसल्यासारखं. पण तेव्हा किती सोप्पं होतं जगणं. शाळा, अभ्यास, तास, मैत्रिणी, मज्जा, परीक्षा, सुट्टी. झालं. दुसरं काही टेन्शन नाही. पण आज किती जबाबदाऱ्या, किती व्यवधानं पेलतायत या सगळ्याजणी. आज जमायचं म्हटल्यावर सुद्धा आपापल्या चिल्ल्यापिल्ल्यांना कुठे, कुणाबरोबर सोडून यावं लागलं असणार. काम लवकर संपवावं लागलं असणार. घरी जाऊन स्वयंपाक करायचा असणार.
ट्रीपमध्ये मिळणारा माझ्या आईचा चिवडा, चित्रान्ना, चटण्या सगळ्यांच्या इतका लक्षात असेल असं वाटलंच नव्हतं. प्रत्येकीने आई-बाबांची चौकशी केली. निघताना त्यांना नमस्कार केला. तीन तास कसे गेले कळलंच नाही. खरं कुणाचाच पाय निघत नव्हता. त्या दिसेनाशा होईपर्यंत बघत राहिले. फक्त सायकलच्या जागी टू व्हीलर आल्या होत्या आणि चेहऱ्यावर निर्भरपणाऐवजी समंजसपणा. दहावीपर्यंत दर वर्षी मॉनिटर होते मी वर्गाची. ऑफ तासाला बोलणाऱ्या मुलींची नावं फळ्यावर लिहायला सांगायच्या बाई. एका अदृश्य फळ्यावर माझ्यासकट आमच्या सगळ्याजणींची नावं तरंगताना दिसायला लागली मला. ही नावं अनेक वर्षांनंतर का असेना. पण माझ्या आयुष्यात परतून आली. याचा आनंद काय सांगू?
ता.क. तुम्ही हा लेख वाचाल तेव्हा फ्रान्समध्ये असेन मी. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी. शाळेत असताना कधीच एकमेकींना बेस्ट लक आणि हॅपी बड्डेशिवाय दुसरं काही म्हणालो

नाही. यावेळी हॅप्पी दिवाळी म्हणावसं वाटतय. :) :) :) तुम्हाला आणि तुमच्या वर्गातल्या सगळ्यांना दिवाळीच्या खू..प खू..प शुभेच्छा :)